मुंबई : मुंबईसह मुंबई महानगरात पाऊस सक्रिय झाला असून सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. अशातच २ जुलैला कुलाबा वेधशाळेत २४ तासांत १५४.० मिमी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती दिलीय. असं असताना मुंबईसह राज्यातील पाणी पुरवठा करणार्या धरणक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याची माहिती आहे. मागील ५ दिवसात राज्यातील पाणीसाठा फक्त १.३३ टक्क्यांनी वाढला आहे. २८ जून रोजी २३.३८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर मागील ५ दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस असताना मात्र, तरीही राज्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ झालेली नाही. राज्यातील धरणांमध्ये आज २४.७१ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, येत्या २-३ दिवसात राज्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि कोकण किनारपट्टीवर असलेल्या शिअर झोनमुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशात, पुढील २-३ दिवसांत राज्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील तलावक्षेत्रात मागील २४ तासात फक्त ०.८१ टक्केच पाणीसाठा वाढला
दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावात ८.९३ टक्के पाणीसाठा उपलबध झाला आहे. मागील २४ तासात फक्त ०.८१ टक्केच पाणीसाठा वाढला आहे. मुंबईमध्ये १ जुलैपर्यंत एकूण ८६८.८ मिमी. पर्जन्यमान असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ३९.८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २८४.८ टक्के पाऊस झाला होता. तर सांताक्रूझ येथे २४ तासांत २०९.० मिमी. नोंद झाली. १ जुलैपर्यंत एकूण ७४८.३ मिमी. पर्जन्यमान असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ३०.८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २२७.७ टक्के पाऊस झाला होता. दिवसभरात पावसाचा जोर आणखी वाढणार असून मुंबईकरांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात येत आहे. तर ५ जुलै पर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.
लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यात मागील ४८ तासांत तब्बल २२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा दिमाखात वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लोणावळ्यातील वर्षाविहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले असून पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. भुशी धरण ङ्गओव्हरफ्लोफ झाले.
जिल्ह्यातील २८ धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ; सुतार वाडी, पाभरे, संदेरी, खैरे धरण १०० टक्के भरली
रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून नद्यांसह धरणांच्या पाणीपातलीत देखील मोठी वाढ झाली आहे.जिल्ह्यातील प्रमुख २८ धरणांतील पाणी साठा ४१.५४ टक्क्यांवर पोहोचला असून सुतार वाडी, पाभरे, संदेरी आणि खैरे हे धरण १०० टक्के भरली आहेत त्यामुळे रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शिवाय वावा, कुडकी, कुथुर्डे, भिलवली धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणी साठा जमा झालाय, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून उर्वरित धरणांमध्ये देखील पाण्याची मोठी वाढ होऊ शकते दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजही दिवसभर मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागातील पाणी आणखी वाढून नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.